- आविष्कार देसाईअलिबाग : ‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.माझ्या वडिलांनीच तटकरे यांना बोट धरून राजकारण शिकवले. याचा विसर त्यांना पडला आहे. सध्याचे राजकारण हे समाजापेक्षा स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या विकासासाठीच आहे, असा आरोप त्यांनी केला.रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन आणि कृषी विकासावर भर देणारे रोजगार उभारले पाहिजेत. यासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी तब्बल ४० वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यामध्ये ३८ रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. हे उद्योग रायगड जिल्ह्यात आले असते तर आजचा तरुण रोजगारासाठी मुंबई, दुबईसारख्या ठिकाणी गेला नसता. नोकरीनिमित्ताने बाहेर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील ७० टक्के घरे कायम बंद असतात. ग्रामीण भागात ७६ टक्के लोक राहतात. त्याचे रोजगाराचे प्रमुख साधन हे शेती आहे. मात्र योग्य नियोजन नसल्याने शेतीमधून केवळ २१ टक्केच उत्पादन घेतले जाते. हे सत्ताधारी आणि विरोधक यांचेच अपयश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, वांद्रे-वरळी सीलिंक, कोस्टल रोड, उरण येथे मंत्रालय, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे नियोजन बॅरिस्टर अंतुले यांनी ७० च्या दशकात केले होते. पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करायला मिळाले असते तर, त्यांनी कोकणाचा नक्कीच कॅलिफोर्निया केला असता. आताच्या नेत्यांनी फक्त घराणेशाही करून राजकारण केले आहे. मुलगा आमदार, मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष, पुतण्या आमदार, महत्त्वाची पदे यांच्याच घरात मग कार्यकर्त्यांनी काय फक्त पक्षाचे झेंडे आणि खुर्च्याच उचलायच्या का असा प्रश्नही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता केला.आजवरचा कौल२००९ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५२ हजार ८०८, तर काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले यांना ४८ हजार ७४२ मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघ वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे केला. त्यावेळी तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसला हा मतदार संघ सोडावा लागला होता. त्यावेळी शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५८ हजार ६७४, तर सुनील तटकरे यांना ७२ हजार १६७ मते मिळाली होती.२०१४ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांना ६१ हजार ३८, शिवसेनेचे रवि मुंढे यांना ६० हजार ९६१ आणि काँग्रेसला तीन हजार ९६० मते मिळाली होती. तर २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेतून नारायण राणे सोबत आलेल्या श्याम सावंत यांना उमेदवारी दिली होती. सावंत यांना ४६ हजार २४०, शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांना ६१ हजार ९६५ मते मिळाली होती.श्रीवर्धन लढवणारमी एकदा श्रीवर्धनमध्ये प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मला बोलले, बेटा तू क्यू यहा आया है.. यहा सब देखने के लिये सुनील हैना...आपल्याला राजकारणात घराणेशाही आणायची नाही. त्यामुळे तू गप्प घरी जा असे बॅरिस्टर अंतुले यांनी सुनावल्याची आठवण नावीद यांनी सांगितली. श्रीवर्धनसाठी कोणीच काही केलेले नाही. त्यामुळे श्रीवर्धनच्या विकासाची जबाबदारी मलाच घ्यायची असल्याने ‘मुझे श्रीवर्धन चाहिये..’ असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नावीद यांनी स्पष्ट केले.