मुंबई - पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना अभिनेत्री ईशा गुप्ताने केलेल्या अजब वक्तव्यामुळे सोशल मीडिया चांगलीच संतापली आहे. भारतीय चित्रपटावर बंदीची मागणी करण्यापेक्षा बलात्कारासारख्या गोष्टींवर बंदीची मागणी का करत नाहीत असा अजब प्रश्न ईशा गुप्ताने विचारला आहे. ईशा गुप्ताच्या या वक्तव्याचा ट्विटरकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बलात्कार हा आधीच आपल्या देशात गुन्हा आहे असं सांगत ट्विटकरांनी अकलेचे तारे तोडल्याबद्दल ईशा गुप्ताला चांगलंच सुनावलं आहे.
पत्रकारांशी बोलताना ईशा गुप्ताने विधान केलं होतं की, 'भारतात बलात्कार झाल्यानंतर कोणीही आम्ही याच्यावर बंदी आणू असं म्हणत नाही. पण चित्रपटावर बंदी आणायच्या वेळी सगळे जागे होतात. चित्रपटाला एवढा विरोध होतो कारण त्यांना माहिती आहे की, आपल्यालाही त्यामुळे प्रसिद्धी मिळणार आहे. त्यांना बलात्कार ही महत्वाची गोष्ट वाटत नाही. त्यांना ख-या सामाजिक मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे'.
ईशा गुप्ताच्या या वक्तव्यावरुन ट्विटकरांनी तिला ट्रोल केलं असून, अपुर्ण ज्ञान असण्यावरुनही सुनावलं आहे. एखाद्या वादग्रस्त विषयावर बोलताना किमान नीट माहिती घेऊन तरी बोलावं असे सल्लेही तिला देण्यात आले आहेत.