नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे आंदोलन केले. या आंदोलनावेळी उपस्थितांना संबोधित करतान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्या देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ द्वेशाचे राजकारण करू शकतात, असे विद्यार्थ्यांना वाटू लागले आहे. आर्थिक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची सातत्याने का घसरण होत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार का मिळत नाही आहे, असा सवाल करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला.
देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाहीत. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही होत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केली जाणार नसल्याची घोषणा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला. हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यावरून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. अशी टीका गहलोत यांनी केली.