नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन विरोधी पक्षाने मंगळवारी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या सभागृहात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून असल्याचा आरोप केला. तसेच, पाकिस्तानसह विदेशी धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल करत एकाच्या बदल्यात दहा शीर घेऊन येऊ, असे सांगणारे आता गप्प का आहेत असा सवाल केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेतील शून्यकाळ हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, 2017 च्या शेवटच्या दिवसात संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात दंग होता. मात्र, यावेळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. मात्र, चिंता याबाबतची आहे की सरकार जवानांच्या सुरक्षतेकडे गंभीरपणे पाहत नाही. याआधीही पंपोर, पठाणकोटसह अनेक भागात दहशतवादी हल्ले झाले आहेत. यावर अनेक समित्या तयार करण्यात आल्या. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, पुलवामा हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आधीपासूनच होती. दहशतवादी ज्याठिकाणाहून घुसले, त्याठिकाणी प्रकाश नव्हता. तसेच, एकाच्या बदल्यात दहा शीर घेवून आणू असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यावर गप्प का बसले आहेत, असा सवाल यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला.