केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तसे सौम्य स्वभावाचे मानले जातात. त्यांनी आजवर आपल्या कामातून अनेकदा विक्रमही प्रस्थापित केले आहेत. एका दिवसात ३० किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करणं असे अनेक विक्रम त्यांच्या विभागानं केले आहे. परंतु अनेकदा त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर चिडतानाही पाहिलं असेल. लोकमत समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर या कार्यक्रमात त्यांनी हसत हसत याचा खुलासाही केला. "मी जे काही काही काम करतो त्याचं श्रेय माझं एकट्याचं नाही. माझ्या सेक्रेटरींपासून माझ्या विभागाच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येक इंजिनिअरचाही त्यात समावेश आहे. आज आपण दिवसाला ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करतोय. मार्च महिन्याच्या अखेरिस आपण ४० किलोमीटर लांबीचे रस्ते उभारण्यापर्यंत मजल मारणार आहोत. मला असं वाटतं की हा कोणत्याही देशाचा एक जागतिक विक्रम असेल. आपल्याच लोकांनी सोलापूर-विजापूरचा एक मार्च जो २४ किलोमीटरचा आहे तो एका दिवसात उभारला. आता मुंबई दिल्ली महामार्गावर अडीच किलोमीटरचा चार लेनचा सिमेंटचा रस्ता आम्ही चोवीस तासांत तयार केला. आपले सगळे जण काम करतायत म्हणूनच हा विक्रम होतोय," असं गडकरी म्हणाले.
... तर व्हिआरएस आणि हाती नारळही मिळेल"कधी कधी माझी भूमिका आईवडिलांसारखी असते. तुम्हाला ७५ टक्के गुण मिळाले पण ८५ टक्के का नाही मिळाले. सिस्टममध्ये अनेकदा काही कमतरता असतात. मी म्हणतो एखादवेळी फायनॅन्शिअल ऑडिट झालं नाही तरी चालेल. परंतु परफॉर्मन्स ऑडिट होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी काम करताना दिसत नाहीत त्यांना मी नक्कीच ओरडतो. त्यामागे काम होणं हे माझं ध्येय असते. अनेकदा काही प्रकल्पांना मंजुरच होण्यास वेळ लागतो. आम्ही ५०० पेक्षा अधिक कामगार असले तर ५ कोटी आणि त्यापेक्षा कमी असले तर २ कोटी रूपये देतो. गरीब कामगारांसाठी ही महत्त्वाची योजना आहे. अनेकदा त्या वर्षानुवर्ष मंजुरी अभावी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे गरीबांवर अन्याय होतो. त्यामुळे मी चिडून सांगितलं अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत जर ती योजना मंजूर झाली नाही तर मी तुम्हाला जबाबदार धरेन आणि तुम्हाला व्हीआरएसही मिळेल, तसंच हाती नारळही मिळेल," असं सांगितल्याचं ते म्हणाले.