रांची - झारखंड येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य कराव असं आव्हान त्यांनी दिलं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे आहे त्याचे उत्तर द्या असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. झारखंड येथील पाकुड येथे त्यांची जाहीरसभा होती.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्याप्रकारे तुम्ही या मैदानतल्या खुर्ची हटवत आहात त्याचप्रकारे तुम्हाला या सरकारला खुर्चीवरुन हटवायचे आहे. जे तुमच्या हिताचं सरकार आहे ते निवडा. विचार करुन मतदान करावे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला आव्हान दिलं पण देशातील समस्यांवर मोदी मौन बाळगून आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या नावावर भाजपा लोकांचे विभाजन करत आहे असा आरोप त्यांनी केला.
या प्रचारसभेदरम्यान उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. एकमेकांवर खुर्ची फेकण्याचं काम लोकांनी केलं. त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, याठिकाणचं पाणी-जंगल आणि जमीन तुमची आहे. ही झारखंडच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजपाची विचारधारा कमकुवत आहे. आदिवासी संस्कृतीवर घाळा घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो असा आरोप त्यांनी केला.
तसेच इंदिरा गांधी यांनी आजीवन तुमच्यासाठी काम केलं आहे, गरिबांसाठी कल्याणकारी योजना त्यांना राबविल्या. भाजपा सरकारने तुमच्या जमिनी बळकावल्या. उत्तर प्रदेशात आदिवासी लोकांच्या हत्या केल्या गेल्या. जमिनी बळकविण्याच्या प्रयत्नात रक्तपात केला असा आरोपही प्रियंका गांधी यांनी भाजपावर केला आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोजगार नाही, उद्योग नाही, बेरोजगारी, शिक्षण, गरिबी, महिला सुरक्षा यावर सरकार काय काम करतंय? मोदी सरकारने श्रीमंतांची कर्ज माफ केली. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाहीत. कांदा, डाळ, पेट्रोल, डिझेल सर्व महाग झाले आहे. सरकारने देशातील अनेक कंपन्या विकून टाकल्या. रेल्वे आणि एअरपोर्टदेखील विकणार आहेत असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.