PM Modi Amit Shah, Vikas Divyakirti: भारतात २०१४ साली काँग्रेसला पराभूत करून भाजपाचे सरकार सत्तेत आले. या सरकारने आता तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. गेल्या दोन टर्ममध्ये राजकारणात अनेक प्रकारचे बदल दिसून आले. अनेक पक्ष फुटले, अनेक नेतेमंडळी एक पक्ष सोडून दुसरीकडे गेले. पण या १० वर्षात एक गोष्ट तशीच राहिली, ती म्हणजे मोदी-शाह जोडी. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही जोडी सध्या भाजपामधील महत्त्वाचे निर्णय घेणारी जोडी आहे असे मानले जाते. गेली १० वर्षे मोदी पंतप्रधान असताना सुरुवातीला अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर नंतर मंत्रिपद मिळून दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले. पंतप्रधान मोदी यांचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? याबाबत प्रसिद्ध शिक्षक आणि मेंटॉर विकास दिव्यकीर्ति सर यांनी ANIच्या एका विशेष मुलाखतीत लॉजिक सांगितले.
"भारतीय राजकारणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील टॉप-२ लोक हे एका कुटुंबातील असतात किंवा खूप चांगले मित्र असतात. तिसरा पर्यायच नसतो. याचे कारण असे की जेव्हा आपण एखाद्या वरिष्ठ ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला आपल्या विश्वासातला माणूसच जवळ लागतो. एखाद्या मुख्यमंत्र्याला माहिती असते की पक्षाचा अध्यक्ष जर माझा चांगला मित्र नसेल तर माझ्या पदाला कायम धोका असेल. त्यामुळे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन लोकं, पती मुख्यमंत्री पत्नी पक्षाची अध्यक्ष असे दिसते. कारण त्यांना माहिती असते की ही व्यक्ती आपल्याला फसवणार नाही. कुठे वडील मुख्यमंत्री तर मुलगा पक्षाध्यक्ष असतो. अशा वेळी कुटुंबातील लोक टॉप-२ असतात," असे दिव्यकीर्ति सर म्हणाले.
मोदींचा शाह यांच्यावर विश्वास का?
"काही ठिकाणी मात्र कुटुंबातील लोक टॉपला असण्याची पद्धत चालू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांचे उदाहरण घेतले तर त्यांच्याकडे कुटुंबातील व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाही. पण पद जाण्याचा धोका त्यांनाही आहे. अशा वेळी जर मोदींच्या विचारांच्या विरोधातील व्यक्ती पक्षाध्यक्ष झाला तर सगळी ऊर्जा त्याच्यावरच खर्च होईल. त्यामुळे त्यांना असा व्यक्ती पक्षाध्यक्ष हवा, ज्याच्यावर मोदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील. म्हणून त्यांना अमित शाह किंवा जेपी नड्डा यांची गरज आहे", असे लॉजिक विकास दिव्यकिर्ती यांनी मांडले.