नवी दिल्ली - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक चांगलीच कंबर कसून हर तऱ्हेची मेहनत घेताना दिसत आहेत. प्रचारसभांचाही जोरदार धडाका राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि सी.पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आईवरुन टीप्पणी केली होती. ''रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय'', असं विधान राज बब्बर यांनी केले होते. हे प्रकरण ताजं असतानाच शनिवारी विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं.
(माझ्या आईला राजकारणात का खेचता होss? मोदींचा काँग्रेसवर 'इमोशनल अटॅक')
मुत्तेमवारांचे वादग्रस्त विधाननरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणीही ओळख नव्हते. त्यांच्या वडिलांचे नावही कोणाला ठाऊक नव्हते, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी, इंदिरा यांचे वडील पं.जवाहरलाल नेहरू यांची नावे देशातील प्रत्येकाला माहिती आहेत, असंही ते म्हणाले. राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
पंतप्रधान मोदींचा पलटवारनिवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेत्यांकडून आपल्या कुटुंबीयांना वारंवार लक्ष्य केले जात असल्यानं पंतप्रधान मोदींनी रविवारी जोरदार हल्लाबोल चढवला. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथे जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला.
'मी कोणाच्याही परिवारासंदर्भात वैयक्तिक स्वरुपातील कोणतेही टीका-टीप्पणी करत नाही. जर माझे आई-वडील राजकारणात असते तर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार होता. माझ्या वडिलांचं 30 वर्षांपूर्वी निधन झाले. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकारणात खेचण्याचं कारण काय?', असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला आहे.
या प्रकारास राहुल गांधींकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. ''काँग्रेसमध्ये असे कोणी आहेत का जे नामदाराच्या (राहुल गांधी) परवानगीशिवाय बोलतात?. नामदार म्हणतात की मोदी माझ्या कुटुंबीयांबद्दलही बोलू शकतात. पण मी केवळ तुमच्या पक्षातील माजी पंतप्रधान-नेतेमंडळी आणि त्यांनी केलेल्या कामासंदर्भात बोलत आहे'', असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली आहे.