नवी दिल्लीः संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या संसदीय दलाची बैठक झाली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह आणि अर्जुन राम मेघवालही उपस्थित होते. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू झालं असून, काँग्रेस खासदारांनी मोठा गदारोळ केला. काँग्रेसनं एसपीजीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, असा प्रतिप्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला. दुसरीकडे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या घरी एक घटना घडली. तेव्हा राहुल गांधी घरी भेटण्यासाठी येणार होते. राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधींची प्रियंका गांधींच्या घरी पोहोचल्यानंतर कोणतीही चौकशी होत नसते, त्यादरम्यान काळ्या रंगातील एक सफारी गाडी प्रियंका गांधींच्या घरी घुसून गाडीतून काँग्रेसचा एक नेता उतरला आहे. राहुल गांधी येणार असतात, त्याच वेळी तो नेता गाडीतून उतरतो. या प्रकरणात तीन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलेलं आहे.
गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 5:13 PM