नवी दिल्ली : सोशल मीडियात अग्रेसर असणा-या व्हॉट्सअॅप कंपनीला सुप्रीम कोर्टाने सोमवारी फटकारले आहे. तसेच, कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.
आतापर्यंत व्हॉट्सअॅप कंपनीने भारतात तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती का केली नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅप, माहिती-तंत्रज्ञान आणि अर्थ मंत्रालयाला नोटीस पाठविली आहे. याचबरोबर, येत्या चार आठवड्याच्या आत नोटीशीला उत्तर देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांची भेट घेतली होती. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी ख्रिस डॅनियल यांना भारतामध्ये लवकरात लवकर तक्रार अधिकारी नेमण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. व्हॉट्सॲपवरून व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजबाबतही चिंता व्यक्त करताना कडक उपाययोजना करण्यासाठी सांगितले होते.
फेक मेसेज व इतर तक्रारींच्या जलद निवारणासाठी व्हॉट्सॲपने एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. कंपनीने आपला डेटा भारतातच स्टोअर करावा; तसेच व्हॉट्सॲपद्वारे पसरविण्यात येणारा अक्षेपार्ह मेसेज रोखण्यासाठी तांत्रिक समाधान शोधावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यांनी दिली होती. तसेच, सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्यासाठी यूजर्समध्ये जनजागृती करावी, असेही यावेळी सुचविण्यात आले होते.