- देवेश फडके
१५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर ट्रेन-१८ सुरू झाली आणि देशात एक नवा इतिहास घडला. सुरुवातीला ट्रेन-१८ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनचे कालांतराने 'वंदे भारत' असे नामकरण करण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेसची दुसरी सेवा सहा ते सात महिन्यांच्या कालावधीनंतर नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा या मार्गावर सुरू झाली. मात्र, तिसरी सेवा सुरू होण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. यानंतर एकामागून एक वंदे भारत ट्रेन सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळाला. २४ सप्टेंबर २०२३ रोजी एकाच दिवशी ९ ठिकाणी वंदे भारतची सेवा सुरू करण्यात आली. आताच्या घडीला देशभरातील ३४ मार्गांवर वंदे भारत ट्रेनच्या सेवा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले जाते.
२४ सप्टेंबर रोजी उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाद या ९ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिसरी वंदे भारत सुरू करण्यात आली. या गोष्टीला आता वर्ष होईल. यानंतर देशभरात वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा झपाटा सुरू झाला तो कायम आहे आणि यापुढेही सुरू राहणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ वंदे भारत सुरू करण्याचा मानस होता. मात्र, ते शक्य झाले नाही. वंदे भारत या ट्रेन प्रकाराचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वंदे भारत मेट्रो, मिनी वंदे भारत, वंदे भारत साधारण अशा अनेक वंदे भारत आगामी काळात देशात पाहायला मिळू शकतात. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताचा चेहरा असला तरी वंदे भारतचा अट्टहास कशासाठी, हा प्रश्न पडतो.
वंदे भारत आणि प्रवाशांचा प्रतिसाद
इतक्या वंदे भारत सुरू करून त्यातील काहीच वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर अनेक मार्गांवरील वंदे भारत ट्रेनकडे तुलनेने प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिकीट दर. भारतीय रेल्वेकडून वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची किती पसंती मिळत आहे, याची आकडेवारी दिली जात असली तरी सुरू करण्यात आलेल्या सर्वच मार्गांवर वंदे भारत यशस्वी ठरत आहे, असे म्हणता येत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा, तो वाढावा यासाठी कमी प्रतिसाद असलेल्या मार्गांवर तिकीट दर कमी करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला. तरीही काही मोजक्या सेवा सोडल्यास वंदे भारतला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही, असे चित्र आहे. सुरुवातीला वंदे भारत ट्रेन १६ डब्यांची होती. मात्र, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे ‘मिनी वंदे भारत’ या नावाखाली ८ डब्यांची वंदे भारत सुरू करण्यात आली. अगदी अलीकडे वंदे भारतचे रुपडे पालटण्यात आले. नव्या रंग-रुपात, नव्या ढंगात, आणखी अद्ययावत, आरामदायी, सुरक्षित वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रवाशांच्या फिडबॅकनुसार, नव्या वंदे भारत ट्रेनमध्ये आवश्यक बदल करण्यात आल्याचे सांगितले गेले.
साधारण वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन निव्वळ धूळफेक
वंदे भारतचे तिकीट दर अजून कमी झाल्यास प्रवाशांचा आणखी उदंड प्रतिसाद मिळू शकतो. काही दिवसांपूर्वी साधारण वंदे भारत एक्स्प्रेसची संकल्पना मांडण्यात आली आणि त्या धर्तीवर डब्यांची निर्मिती करण्यात आली. साधारण वंदे भारत ट्रेन ही निव्वळ धूळफेक आहे. याचे कारण विद्यमान एलएचबी (Linke Hofmann Busch - LHB) तंत्रज्ञान असलेल्या डब्यांना नव्या वंदे भारतसारखा रंग देऊन या ट्रेन चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे तिकीट दर कमी आहे, असे जे कारण दिले जात आहे, त्यात विशेष तथ्य वाटत नाही. विद्यमान एलएचबी बनावटीच्या ट्रेनचे तिकीट हे वंदे भारत ट्रेनच्या तिकिटांपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे कमी तिकीट दरात वंदे भारतची सेवा मिळणार, अशी अपेक्षा प्रवाशांनी न ठेवलेलीच बरी. शिवाय वंदे भारतचा दर्जा दिला तर, सध्याच्या एलएचबी ट्रेनच्या तिकीट दरात काहीशी वाढच होऊ शकते. मात्र, वंदे भारतच्या तिकीट दरांच्या तुलनेत साधारण वंदे भारतचे तिकीट दर कमी असतील, हे नक्की.
वंदे भारत आणि शताब्दी एक्स्प्रेस
भारतीय रेल्वेवर सुरू असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या तुलनेत वंदे भारत ट्रेन अनेक बाबतीत अतिशय उजवी ठरणारी आहे. आकर्षक डिझाइन, बनावट, वेग, आरामदायी, अद्ययावतता, सुरक्षितता, सुविधा या बाबतीत वंदे भारत ट्रेन सर्वोत्तम ठरते, यात काहीच वाद नाही. वास्तविक शताब्दी ट्रेनच्या धर्तीवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. काही रिपोर्टनुसार, वंदे भारत ही शताब्दीला रिप्लेसमेंट असल्याचे बोलले गेले. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. आताच्या घडीला देशातील २१ मार्गावर शताब्दी एक्स्प्रेसची सेवा सुरू असून, सुमारे २०१७ नंतर एकही नवीन शताब्दी सुरू झालेली नाही. मात्र, देशातील असे अनेक मार्ग असू शकतात, जिथे शताब्दी ट्रेनची सेवा सुरू केली जाऊ शकते. मात्र, वंदे भारतच्या प्रचार आणि प्रसारामुळे या गोष्टी मागे पडलेल्या दिसतात.
स्लीपर वंदे भारत आणि राजधानी एक्स्प्रेस
भारतीय रेल्वेची शान म्हणजे राजधानी एक्स्प्रेस. आजही अनेक जण एकदा तरी राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करावा, अशी इच्छा मनात बाळगून असतात. राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मिळणार आदर, त्यातील सोयी-सुविधा, वेग, अद्ययावतता यांची भूरळ देशवासीयांना आहे. यात भर पडली ती तेजस राजधानी एक्स्प्रेस संकल्पनेची. आताच्या घडीला ५ मार्गांवर तेजस राजधानी एक्स्प्रेस धावत आहेत. बाकी अन्य मार्गांवर नेहमीच्या राजधानी चालवल्या जात आहेत. नेहमीच्या राजधानी ट्रेन या तेजस राजधानीशी रिप्लेस केल्या जात आहेत. नेहमीच्या राजधानीपेक्षा तेजस राजधानीची रंगसंगती, आरामदायीपणा, सुरक्षितता अगदी अद्ययावत आहेत. मात्र, ही संख्या वाढवणे आवश्यक आहे. कारण ती काळाची गरज आहे. यातच स्लीपर वंदे भारत काही महिन्यात येऊ शकते, असा कयास आहे. या स्लीपर वंदे भारत ट्रेन राजधानी मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. परंतु, त्याचा तिकीट दर हा जास्त असणार हे नक्की. एका बाजूला स्लीपर वंदे भारत ट्रेनची बांधणीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे तेजस राजधानी ट्रेन वाढवण्यावर भर दिला जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, सन २०२१ नंतर ऑगस्ट २०२३ पर्यंत एकही तेजस राजधानी सुरू झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे.
डबल डेकर, हमसफर आणि अंत्योदय एक्स्प्रेस
डबर डेकर ट्रेन हा भारतीय रेल्वेने केलेला एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग म्हणता येईल. जुन्या काळात सिंहगड, फ्लाइंग राणी अशा काही मोजक्या ट्रेन डबल डेकर स्वरुपात होत्या. मात्र, एलएचबी डब्यांच्या धाटणीची डबल डेकर ट्रेन सुरू करून भारतीय रेल्वेने एक नवा अध्याय लिहिला. मात्र, अधिकचे तिकीट दर, चुकीचे रेल्वे मार्ग आणि प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद यामुळे डबल डेकर संकल्पना गुंडाळण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला ५ डबल डेकर ट्रेन सेवेत असून, ६ डबल डेकर ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. १९०६ सालापासून मुंबई-सुरत मार्गावर फ्लाइंग राणी ट्रेन सुरू आहे. १८ डिसेंबर १९७९ सालापासून ही ट्रेन डबल डेकर स्वरुपात चालवली जात होती. मात्र, अलीकडेच फ्लाइंग राणीची सगळी शान घालवून साध्या ट्रेनमध्ये त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. वास्तविक पाहता, नॉन एसी डबल डेकर डबे तयार करणे भारतीय रेल्वेसाठी कठीण गोष्ट नाही. पण तसे करण्यात आले नाही. तसेच अत्यल्प प्रतिसाद असलेल्या डबल डेकर ट्रेन मार्गांवर काही डबे नॉन एसीचे जोडून एसी आणि नॉन एसी या संरचनेत डबल डेकर ट्रेन सुरू करता आली असती. मात्र, याबाबत भारतीय रेल्वेचे धोरण उदासीन असल्याचे पाहायला मिळते. डबल डेकर उदय ही संकल्पना सुरू करण्यात आली. मात्र, या संकल्पनेवरील केवळ २ ट्रेन सेवेत असून, २०१९ नंतर त्यात काहीच अपडेट नसल्याचे दिसत आहे. डबल डेकर प्रमाणे अगदी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या हमसफर, अंत्योदय या रेल्वे सेवांबाबतही रेल्वेचे धोरण उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२१ नंतर हमसफर एक्स्प्रेस आणि २०१९ नंतर अंत्योदय एक्स्प्रेसच्या एकाही सेवेत वाढ झालेली दिसत नाही. गरीब रथ एक्स्प्रेस, युवा एक्स्प्रेस, गतिमान एक्स्प्रेस या सेवांची नावेही आता कुठेच ऐकू येत नाहीत.
शेवटी, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली वंदे भारत कितीही खास असली, देशाचा अभिमान ठरत असली तरी केवळ वंदे भारतचा अट्टहास करून चालणार नाही. देशात ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी सर्व जोर त्यावर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तिकीट दर हा महत्त्वाचा भाग असून, त्यात सवलत देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार रेल्वेने करणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेकडे अन्यही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ वंदे भारताचे घोडे दामटवून भागणारे नाही. अन्य प्रकल्पांवर रेल्वे काम करत असली तरी त्याचा वेग हा अत्यंत कमी आहे. वंदे भारतच्या तुलनेत नगण्य आहे, हे मान्य करावेच लागेल. अन्यथा बाकीचे प्रकल्प बंद करून एकदाचे काय ते वंदे भारतचे उद्दिष्टच साध्य करा आणि मग एकमार्गी फक्त आणि फक्त अन्य प्रकल्पांवर भर द्या, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा...!!!