Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तर, चौथ्या टप्प्यातील मतदारांसाठी पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रचार सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी(दि.7) मध्य प्रदेशातील धार येथे जाहीर सभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
मोदी म्हणाले, आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे, पण पहिल्या टप्प्यातच विरोधकांचा पराभव झाला, दुसऱ्या टप्प्यात विरोधक नेस्तनाबूत झाले. आता आज तिसऱ्या टप्प्यात जे काही उरले आहेत, तेही कोसळणार आहे. भाजपला 400 जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील, अशी नवी अफवा काँग्रेसचे लोक पसरवत आहेत. काँग्रेसच्या बुद्धीला जणू व्होट बँकेनेच कुलूप लावले आहे, असे दिसते, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.
400 जागा का मागत आहेत?यंदाच्या निवडणुकीत भाजप 400 पारचा नारा देत आहेत. याबाबत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, एनडीए 400 जागा का मागत आहे, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे षड्यंत्र रोखण्यासाठी. आम्ही 400 जागा मागत आहोत, जेणेकरुन काँग्रेसला पुन्हा काश्मीरमध्ये कलम 370 लागू करता येऊ नये, बाबरी, अयोध्येच्या राम मंदिराला कुलूप लावता येऊ नये, देशातील मोकळ्या जमिनी आणि बेटे इतर देशांच्या ताब्यात देता येऊ नयेत, एससी/एसटी/ओबीसींना दिलेल्या आरक्षणाचा गैरफायदा व्होट बँकेसाठी घेऊ नये, आपल्या व्होट बँकेसाठी सर्व जातींना रातोरात ओबीसी म्हणून घोषित करू नये, यासाठी आम्ही 400 जागा मागत आहोत.