Sam Pitroda : लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, आता निवडणुकीनंतर काँग्रेसने पित्रोदा यांची पुन्हा आपल्या पदावर नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एक प्रेस नोट जारी करुन पित्रोदा यांच्या नियुक्तीची माहिती दिली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले पित्रोदा काँग्रेससाठी इतके महत्वाचे का आहेत? चला जाणून घेऊ...
सॅम पित्रोदा यांची पुन्हा आपल्या पदावर नियुक्ती केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्याचा हवाला दिला, ज्यात त्यांनी निवडणुकीनंतर पित्रोदा यांना परत घेतले जाईल, असे म्हटले होते. काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेडा यांनीही पित्रोदा यांच्या पुनरागमनाचा खरपूस समाचार घेतला. खेडा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, राहुल गांधींचे परदेश टूर मॅनेजर परतले. यावरुन हे स्पष्ट झाले आहे की, राहुल संसदेत कमी आणि परदेशात जास्त दिसतील.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेस नेमकं काय काम करते?इंडियन ओव्हरसीज काँग्रेस, हा काँग्रेसमधील एक विभाग आहे, ज्याचे काम परदेशात राहणाऱ्या भारतीयांशी संपर्क प्रस्थापित करणे आहे. काँग्रेसच्या मते, परदेश विभागाचे काम अनिवासी भारतीयांना आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि परदेशात एक मजबूत व्यासपीठ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. काँग्रेसचे ओव्हरसीज डिपार्टमेंट सेक्रेटरी वीरेंद्र वशिष्ठ यांच्या मते इंदिरा गांधींच्या काळात हा विभाग खूप सक्रिय होता. विभागातील लोक भारतीय वंशाच्या परदेशातील लोकांना जोडण्याचे काम करतात.
भारताच्या मतदार यादीत NRI मतदारांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे हा विभाग खूप महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 118,000 हून अधिक NRI मतदारांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवली होती. अनिवासी भारतीय मतदारांशी संपर्क साधण्यासोबतच परदेशात पक्षाच्या नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करणे, हे ओव्हरसीज विभागाचे काम आहे.
काँग्रेससाठी सॅम पित्रोदा का महत्त्वाचे?सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे सल्लागार म्हणून ओळखले जातात. राहुल नियमितपणे सॅम यांचा सल्ला घेत असल्याचे काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते. सॅम यांची गांधी घराण्याशी जवळीक होण्याचे कारण म्हणजे, त्यांची राजीव गांधींशी असलेली मैत्री. 2015 मध्ये पित्रोदा यांच्या पुस्तकाचे अनावरण करताना राहुल म्हणाले होते की, जेव्हा मी पित्रोदा यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला माझ्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवली. 2006 मध्ये भारतातील एका खासगी हॉटेलमध्ये राहुल यांची सॅम पित्रोदा यांची भेट झाली होती. पित्रोदा त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते.
पित्रोदा यांना परत का घेतले?काँग्रेसच्या ओव्हरसीज विभागाचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस हायकमांडवर आमच्या विभागाचा दबाव होता. आमच्या युनिटच्या वतीने पक्षाला सांगण्यात आले की, सॅम पित्रोदा यांनी दिलेली विधाने चुकीची नाहीत. मीडियाने त्याचा चुकीचा उल्लेख केला होता. अशा स्थितीत त्यांचा राजीनामा घेणे योग्य होणार नाही. पित्रोदा या संस्थेशी बऱ्याच काळापासून जोडले गेले आहेत आणि अनेक लोकांच्या संपर्कातही असतात. संस्थेला सध्या त्यांच्यासारखा चेहरा नव्हता, त्यामुळेच ते परतले आहेत.