भारतामध्ये वाहतुकीचे नियम हे पाश्चात्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतामध्ये कारचं स्टियरिंग व्हिल हे उजवीकडे असतं. तर अमेरिकेसह अन्य देशांमध्ये ते डावीकडे असल्याचं पाहायला मिळतं. असं का असतं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? भारतात स्टियरिंग व्हिल हे डावीकडे का दिलं जात नाही. मध्यभागी का दिलं जात नाही, हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का, आता आम्ही सांगतो. १९४७ रोजी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. त्यावेळी प्रवास आणि वाहतूक सुगम बनवण्यासाठी ब्रिटिशांनी रस्त्यावरून डाव्या दिशाने चालण्याचा नियम बनवला. तेव्हापासून वाहने आणि पादचारी डावीकडून चालू लागले.
त्याकाळी प्रवासासाठी बहुतांश करून टांगे आणि बग्गी यांचा वापर केला जात असे. हा नियम लागू झाल्यानंतर बग्गी चालवणारे बग्गीसमोर उजवीकडे बसू लागले. कारण मध्ये बसल्याने त्यांना समोरून येणाऱ्या अन्य बग्गी पाहण्यास अडचणी येत असत. मात्र उजवीकडे बसून बग्गी चालवल्याने ते समोरून येणाऱ्या बग्गी सहजपणे पाहू शकत असत. तसेच सुरक्षितपणे बग्गी चालवणेही त्यांना शक्य होई. इंग्रजांनी नियम बनवल्यानंतर बग्गीचालक बग्गीच्या उजव्या बाजूला बसू लागले. त्यानंतर हाच नियम कारसाठीही लागू करण्यात आला.
बदलत्या काळाबरोबरच टांगे, बग्गी यांची जागा कारनी घेतली. त्यावेळी कारमध्येही ड्रायव्हर्सना पुढे पाहण्यात अडचण येऊ नये यासाठी ड्रायव्हरची सिट ही उजवीकडे दिली जाऊ लागली. त्यामुळे कार चालवताना इतर वाहनांना आरामात पाहता येतं. त्यामुळे ड्रायव्हर अधिक सहजपणे वाहन चालवू शकतात.
मग अमेरिका किंवा इतर काही देशांमध्ये कारच्या डावीकडे स्टियरिंग व्हि़ल का असतं असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण आहे. ज्या देशांमध्ये रस्त्यावर उजवीकडून चालण्याचा नियम आहे, अशा देशांमध्ये डावीकडे स्टियरिंग व्हिल दिलं जातं. त्यामुळे ड्रायव्हर सहजपणे कार चालवू शकतात.