उत्तराखंडमधीलकेदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावलेल्या सोन्याचा रंग का बदलत आहे, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी बद्री केदार मंदिर समितीने स्पष्टीकरण दिलं आहे. हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात लावलेल्या सोन्याचा रंग आता तांब्यासारखा झाला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
केदारनाथ मंदिरातील गर्भगृहाच्या भिंतींना काही महिन्यंपूर्वी महाराष्ट्रातील एका देणगीदाराने कॉपर प्लेट आणि सोन्याने मढवले होते. या सर्वांची किंमत अब्जावधीमध्ये आहे, असे म्हटले जात होते. दरम्यान केदारनाथमधील काही पंड्यांनी मंदिरातील सोनं काळं पडत असल्याचा दावा केला आहे. त्यादरम्यान, आता काही लोक मंदिराच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या सोन्याला पॉलिश करत असल्याचे फोटो समोर आले आहेत.
तर बद्री केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजयेंद्र अजय यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, मंदिरामध्ये सुमारे १५ कोटी रुपये किमतीचे २३ किलोंपेक्षा अधिकचे सोने आणि २९ लाख रुपयांच्या सुमारे १ हजार किलो वजनाच्या कॉपर प्लेट लावण्यात आल्या आहेत. तज्ज्ञ सांगतात की, दोन धातूंच्या मिश्रणामध्ये जेव्हा तांब्याचं प्रमाण अधिक असतं. तेव्हा काही काळानंतर काळेपणा दिसण स्वाभाविक आहे. मंदिर प्रशासनाने याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणातून याबाबत सुरू असलेल्या उलटसूलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये केदारनाथ मंदिराल लावण्यात आलेलं सोनं हे पितळेमध्ये रूपांतरीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गर्भगृहामध्ये सोन्याचा थर देण्याच्या नावावर सव्वा अब्ज रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा करण्यात येत आहे.