नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रापासून ते चित्त्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर बोलतात, पण ते मणिपूरवर बोलत नाही. त्यांनी मणिपूरप्रश्नी ‘मन की बात’ करायला हवी होती, असे मत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.
चौधरी म्हणाले, आम्हाला प्रश्न पडला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत का येत नाही, मणिपूरप्रश्नी ते बोलत का नाही, त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. त्यांनी किमान एकदा तरी मणिपूरबाबत ‘मन की बात’ केली असती, तर काय बिघडले असते? त्यांना सर्व प्रश्नांवर बोलायला वेळ आहे, चंद्रापासून ते कुनोतील चित्त्यांवर बोलायला वेळ आहे, पण मणिपूरविषयी ते गप्प राहतात.
मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्हाला देशाच्या जनतेशी देणे-घेणे आहे. आम्ही मणिपूरची अवस्था पाहिली, गंभीर परिस्थिती तिथे आहे. पण देशाचे नेतृत्व म्हणून तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी किमान दोन शब्द बोलायला हवे होते. अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे नेते
विरोधकांचा सभात्यागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात अनेक वेळ मणिपूरवर वक्तव्य न केल्याने विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
तुम्ही स्वप्ने दाखवता, आम्ही साकार करतो - निर्मला
संपुआ सरकारच्या काळात सर्वसामान्य व गरिबांना अनेक मूलभूत गरजांची पूर्तता होणार म्हणून स्वप्ने दाखवली जायची. गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांची ही स्वप्ने साकार केली, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. २०१४ आणि २०१९ मध्ये जनतेने संपुआवर जो अविश्वास दाखवला त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला सीतारामन यांनी लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षांना लगावला.
सध्या दोनशे रुपये किलो दराने विकले जात असलेल्या टोमॅटोचे दर दिल्लीत लवकरच ७० रुपये प्रतिकिलो होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून खरेदी करून टोमॅटो दिल्लीत ७० रुपये दराने उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी, २०१३ला जगातील पाच सर्वांत नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होता. तिथून नऊ वर्षांत कोरोनापश्चातही भारताची अर्थव्यवस्था सुधारून आज जगातील सर्वांत वेगवान वाढ नोंदविणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था२०२३-२४ मध्ये ६.५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणाकेल्यामुळे शक्य झाले. - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री