- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) जारी करण्यात आलेल्या फलकांवर (पोस्टर) जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र वगळण्यात आल्यावरून काँग्रेस आणि केंद्र सरकारदरम्यान जोरदार जुंपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेतुत: नेहरू यांची प्रासंगिकता संपविण्यासाठी एका कटानुसार नेहरू यांचे नाव, त्यांचे यश, स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांची भूमिका इतिहासाच्या पानांतून हटवू पाहत आहे.
तथापि, आयसीएचआरने असा खुलासा केला की, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव पोस्टरच्या मालिकेतील हे पहिले पोस्टर आहे. पुढच्या पोस्टरवर पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सावरकर यासारख्या नेत्यांची छायाचित्रे आहेत, नेहरू यांचे छायाचित्र का वगळण्यात आले. असा सवाल करून काँग्रेसने सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
पत्रकार वीर संघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, विजेते इतिहास लिहितात; परंतु, आज भारतात मूर्खांकडून इतिहास लिहिला जात आहे. हे स्पष्टच आहे की, आयसीएचआरमधील एकानेही नेहरू वाचले नाहीत.काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अशी टिप्पणी केली की, माफी मागणे हे संघाचे चारित्र्य आहे. सावरकारांनी माफी मागितली, आणीबाणीच्या काळात संघाच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली. या लोकांना भगतसिंग, महात्मा गांधी, नेहरू यासारख्या देशभक्तांची गरज नाही.
माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी ट्विट करून पहिल्या पोस्टरवर नेहरू यांचे छायाचित्र का नाही, याबाबत आयसीएचआरच्या सदस्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. आयसीएचआरने केलेला खुलासाही हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी परखड टिप्पणी केली आहे. काही अज्ञानी लोकांच्या मानसिकतेने खऱ्याचे खोटे होणार नाही.
माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पत्नी आजारी असतानाही पं. नेहरू यांनी स्वातंत्र्यासाठी दहा वर्षे इंग्रजांकडे सुटी मागितली नाही. त्यांचे छायाचित्र नसणे, यातून सरकारची तिरस्करणीय नियत दिसते. विशेष म्हणजे इंग्रजांकडे माफी मागणारे सावरकर यांचे छायाचित्र पोस्टरवर छापले आहे. जयराम रमेश म्हणाले की, नेहरू यांचे छायाचित्र पोस्टर नसल्याप्रकरणी मोदी गप्प का? त्यांचे छायाचित्र नसणे स्वातंत्र्याच्या तथ्यांची थट्टा आहे. नेहरू यांचा वारसा मोदी संपवू पाहत आहेत. दुर्भावना न बाळगता मोदी यांनी आयसीएचआरला कठोर निर्देश दिले पाहिजेत.
आयसीएचआर आणि केंद्र सरकारवर टीका करतांना काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी म्हटले की, ही काही किरकोळ बाब नाही; स्वातंत्र्याच्या आंदोलनाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. आयसीएचआरने आधीसुद्धा असला खोडसाळपणा केलेला आहे.