नवी दिल्ली : सीबीआय काही आरोपींसाठी वेगळे धोरण लागू करू शकत नाही, असे सांगत विशेष न्यायालयाने कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्यातील आरोपी व उद्योगपती नवीन जिंदाल यांचा पासपोर्ट ताब्यात न घेतल्याबद्दल तपास संस्थेला खडसावले. या प्रकरणी जिंदाल यांच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.‘आरोपींचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी या तपासादरम्यान समान धोरण अवलंबण्यात येईल, हे सीबीआयने सुनिश्चित केले पाहिजे. प्रकरण दाखल झाल्यानंतर सीबीआयने सर्व आरोपींचे पासपोर्ट जप्त करण्याचे समान धोरण अवलंबिले आहे, हे खरे असले तरी या प्रकरणात मात्र सीबीआयने वेगळे धोरण अवलंबिले. याचे काय कारण आहे, हे सीबीआयलाच माहीत असावे,’ असे विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांनी म्हटले. तपासादरम्यान जिंदाल यांचा पासपोर्ट जप्त केला जाणार नाही, असा निर्णय सीबीआय कार्यालयात घेण्यात आला होता, असे सरकारी वकील व्ही.के. शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले.सीबीआयसमक्ष आपला पासपोर्ट जमा करण्यासाठी नवीन जिंदाल यांना नोटीस जारी करण्यात आली होती; परंतु काही काळानंतर आपला पासपोर्ट जप्त केला जाऊ नये, अशी विनंती करीत जिंदाल यांनी आपल्या पासपोर्टची एक रंगीत प्रत सीबीआयला दिली, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने न्यायालयात दिली. त्यावर न्या. पाराशर म्हणाले की, ‘न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया जाऊ नये यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या सर्वच प्रकरणांत एक समान धोरण अवलंबिले जावे, असे निर्देश सीबीआय संचालकांना दिले जात आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
जिंदाल यांचा पासपोर्ट जप्त का केला नाही?
By admin | Published: May 01, 2015 1:55 AM