नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' या घोषणेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. मनमोहन सिंग यांना या घोषणेवर अडचण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलत होते. देशात काही राजकीय पक्ष असे आहेत की जे स्वत: चा फायदा देशापेक्षा अधिक महत्त्वाचा मानत असल्याचा दावा मोदींनी यावेळी केला.
गेल्या महिन्यात मनमोहन सिंग यांनी भारत माता की जय या घोषणेचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले होते. त्यावर मोदींनी विचारले की, भारत माता की जय या घोषणेत वावगं काय आहे. पुढे मोदी म्हणाले की, देश सर्वोच्च आहे. विकास करणे भाजपचा मंत्र असून त्यासाठी शांतता आणि सद्भावना आवश्यक आहे.
या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला.
राष्ट्रवाद व ‘भारत माता की जय’ या घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व विचार यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.