नवी दिल्ली: देशावर 600 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या मुस्लिम समाजाला आता कशाची भीती वाटतेय, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व धमांमध्ये समन्वय असायला हवा, असं म्हणत कोणाला भीती वाटत असल्यास त्यांनी चर्चा करायला हवी, असा सल्लादेखील गोपाळ यांनी दिला. मुघल बादशाह शाहजहानचा पुत्र दारा शिकोहवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील काही धर्मीयांची संख्या अवघ्या काही लाखांच्या घरात आहे. तर मुस्लिमांची संख्या 16-17 कोटी इतकी आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजात का भयभीत झाला आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणाच्या मनात भीतीची भावना असल्यास त्यांनी संवाद साधून ती दूर करावी, असं गोपाळ म्हणाले. 'पाकिस्तानी दु:खी राहावेत, असा विचारदेखील भारतीयांच्या मनात येणार नाही. कारण सर्वे भवन्तु सुखिनः अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे,' असं गोपाळ यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी एका लेखाचा संदर्भ देत काही आकडेवारी सांगितली. 'देशातील पारशी समाजाची संख्या 50 हजार आहे. तर जैनांची संख्या 45 लाख, बौद्धांची 80-90 लाख, यहुदींची 5 हजार आहे. मात्र या समाजांना भीती वाटत नाही. पारशी घाबरलेत, जैन भयभीत आहेत, असं तुम्ही कधी ऐकलंय का? मग तुम्ही 16-17 कोटी असूनही भयभीत का? तुम्ही कोणामुळे घाबरले आहात?' असे प्रश्न गोपाळ यांनी उपस्थित केले. ज्या समाजानं 600 वर्ष सत्ता गाजवली. त्या कोणाची भीती वाटते?, असा सवालदेखील त्यांनी विचारला.
'देशावर 600 वर्ष राज्य करणाऱ्या मुस्लिमांना कशाची भीती वाटतेय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 11:12 AM