शीलेश शर्मा -नवी दिल्ली : गुजरातमधील मुंद्रा बंदरात पकडल्या गेलेल्या ३ हजार किलोग्रॅम अमली पदार्थावर (हेरॉइन) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळगलेल्या मौनानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.काँग्रेससह विरोधी पक्ष विचारत आहेत की, मुंद्रा बंदराचे मालक अदानी असल्यामुळे मोदी यांनी मौन धारण केले आहे का? काँग्रेसने दावा केला की, मुंद्रा बंदरात पकडले गेलेले अमली पदार्थ आतापर्यंतचे सगळ्यात जास्त असून, ते संपूर्ण देशातील युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावण्यास पुरेसे आहे.अफगाणिस्तानमधून गुजरातला हेरॉईन पोहोचले कसे, अमली पदार्थ विभाग आणि गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या? कारण हे ड्रग सामान्य तपासणीत पकडले गेले. विभागाला त्याची काहीही पूर्वकल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग पकडले गेल्यावर असा प्रश्न उपस्थित होतो की, ड्रगची तस्करी करणाऱ्यांनी गुजरातमधील त्याच बंदराला का निवडले जो अदानी यांचा आहे? काँग्रेसने ११ प्रश्न विचारून विचारले की, गेल्या १८ महिन्यापासून नार्कोटिक विभागाचे महासंचालकपद का रिक्त आहे? पक्षाचे प्रवक्त्याने यामागे सरकारचा हेतू काय? असे विचारले आहे.
सुरजेवाला म्हणाले...- या तस्करीमागे कोणते लोक आहेत व त्यांना कोण मदत करीत आहे याची उत्तरे सरकारने द्यावीत, असे काँग्रेसचे महासचिव रणदीप सूरजेवाला म्हणाले. ते म्हणाले की,“गुजरातमध्ये अदानी मुंद्रा बंदरावर जप्त ३ हजार किलो ड्रग्जची किमत २१ हजार कोटी रुपये सांगितली जात आहे. - हे ड्रग्ज तालिबानकडून पाठविले जात आहे. मोदी यांनी सांगावे की, भारतातील युवकांना नशेत ढकलण्याच्या कटात कोण दोषी आहे आणि आतापर्यंत किती हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ तपासाविनाच निसटून गेले?”