नवी दिल्ली : देशाचा विकास दर घसरत चालला असल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावेळी संसदेत बोलताना अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली आहे. निर्मला सीतारामन यांना 'निर्बला' संबोधल्याने संसदेत गदारोळ उडाला आहे.
देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांची घरण झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच दर 2.6 टकक्यांनी घसरला आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यातच उद्योगपती बजाज यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्योगपती खरे बोलायला घाबरत असल्याचे वक्तव्य़ केले होते. यावरून मंदीच्या खाईत असलेल्या उद्योगक्षेत्रातील खदखद यावेळी व्यक्त झाली होती.
यावेळी चर्चा सुरू असताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीची सुरूवात 1934 मध्ये झाली होती. या आधी कोणताही जीडीपी नव्हता. जीडीपीला केवळ बायबल, रामायण किंवा महाभारत मानने खरे नाही. तसेच भविष्यात जीडीपीचा काही उपयोगही राहणार नाही. आजच्या मिमांसेनुसार शाश्वत आर्थिक कल्याण सामान्यांचे होत आहे की नाही. जीडीपी पेक्षा शाश्वत विकास, आनंद होत आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
तर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना घुसखोर म्हटले होते. यावरूनही संसदेत वाद झाला होता. आज भाजपाचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधीच देशातील घुसखोर असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून वातावरण निवळत नाही तोच अधीर रंजन यांचे आणखी एक वक्तव्य आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्मला या नावाच्य़ा जागी निर्बला का म्हणू नये, असा कधी कधी विचार करत असल्याचे ते म्हणाले. तसेच तुम्ही मंत्री पदावर तर आहात पण जे तुमच्या मनात आहे ते कधी सांगू शकता की नाही, अशी शंकाही उपस्थित केली आहे.