नवी दिल्ली - बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली असून देशपातळीवर हे प्रकरण अतिशय शांत आहे. त्यामुळे, देशात जातनिहाय जनगणना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातनिहाय जनगणना सुरू करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. आता, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनीही जातनिहाय जनगणना अद्याप का सुरू केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. वास्तविक २०२१ मध्येच जनगणना व्हायला हवी होती, असेही कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.
भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना होत असते, त्याचा अहवालही सरकारने सादर करायला हवा, असेही कन्हैय्या कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच, राहुल गांधींनी चोरांना चोर म्हटलं तर, यांनी तो ओबीसीचा अपमान असल्याचे सांगितले. जातीच्या नावाने मतं मिळवतील, जातीच्या नावाने विरोधी पक्षाला लक्ष्य बनवतील. पण, जातनिहाय जनगणना घेणार नाहीत, असे म्हणत कन्हैय्या कुमारने मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
सरकार ना २० हजार कोटी रुपयांच्या प्रश्नावर उत्तर देते, ना देशातील वास्तविक लोकसंख्या सांगत आहे. कारण, पंतप्रधान कधी भाषणात देशाची लोकसंख्या १४० कोटी म्हणतात, तर कधी १३५ कोटी म्हणतात. त्यामुळेच, देशातील एकूण लोकसंख्या किती, किती वाढली आणि सध्या जातनिहाय सर्वच वर्गांची परिस्थिती कशी आहे, याची माहिती उपलब्ध व्हायला हवीच. देशात दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची संख्या किती आहे, हेही देशातील लोकांना समजायला हवं, असे म्हणत कन्हैय्या कुमार यांनी जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी केलीय.