उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही निशाण्यावर घेतले. धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे.
उपराष्ट्रपती म्हणाले की, आज शेतकरी आंदोलन करत असतील, तर त्या आंदोलनाचे मर्यादित स्वरूपात मूल्यांकन करणे ही मोठी चूक ठरेल. रस्त्यावर न उतरणारे शेतकरीही आज चिंतित आणि व्यथित आहेत. भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न आठ पटीने वाढवावे लागेल. ते आठपट वाढवण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी कल्याणाचा आहे.
जगदीप धनखड यांनी शिवराज सिंहांना घेतलं निशाण्यावर - कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न विचारत धनखड म्हणाले, "शेतकऱ्यांशी चर्चा का होत नाही, हे मला समजत नाही? मला हे समजत नाही की, आपण अर्थतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्याशी चर्चा करून, असा फॉर्म्युला का तयार करू शकत नाही, जो आपल्या शेतकऱ्यांना पुरस्कृत करू शकेल. अरे, आपण तर जे देय आहे, त्याबदल्यात बक्षीस नाही देत आहोत. आपण जे वचन दिले आहे, त्यात कंजुषपणा करत आहोत."
शिवराज सिंहांना सवाल -उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, "शेतकरी आपल्यासाठी आदरणीय आहेत, प्रातःस्मरणीय आहेत, सदैव वंदनीय आहेत. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला काय सहन करावे लागते, मला माहित आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद सर्वत्र पसरलेली आहे. देशभरात 180 हून अधिक संस्था आहेत, ज्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. शेती, शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पैलू स्पर्शिले गेले आहेत. शेतकऱ्याशी चर्चा करण्यास विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती का? हेही आपल्याला माहीत असायला हवे. पंतप्रधानांनी जगाला दिलेला संदेश हा आहे की, कृषीमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते, तर त्याचे काय झाले? गुंतागुंतीचे प्रश्न संवादातून सुटतात, असा संदेश पंतप्रधानांनी जगाला दिला आहे. कृषिमंत्री जी, आपल्या आधी जे कृषिमंत्री होते, त्यांनी लेखी स्वरुपात काही आश्वासन दिले होते? जर काही आश्वासन दिले असेल, तर त्याचेकाय झाले?"