नवी दिल्ली : निर्भया निधी अखर्चित राहिला किंवा याबाबतच्या वस्तुस्थितीची शहानिशा करा, असा आदेश राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी केंद्र सरकारला दिला. २०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर या निधीची स्थापना करण्यात आली होती. एका राज्यसभा सदस्याने निर्भया निधीचा वापरच झाला नसल्याचा दावा केला होता. त्याची गंभीर दखल घेत कुरियन यांनी सरकारला याची शहानिशा करण्यास सांगितले. ते म्हणाले की, डिसेंबर २०१२ मध्ये निमवैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. नंतर या तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या स्मृत्यर्थ देशातील महिलांची आब आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी या निधीची स्थापना करण्यात आली होती. दास वैद्य यांच्या विशेष उल्लेखाची नोंद घेताना कुरियन यांनी सरकारला या निधीच्या वापराची वस्तुस्थिती विचारली. कुरियन म्हणाले की, ही अर्थसंकल्पीय तरतूद होती. याउपरही ती खर्च का करण्यात आली नाही, याची शहानिशा करणे आवर्शंयक आहे, असे मला वाटते. हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा असून, त्याची नोंद घेण्यात आली आहे, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केले.माकपाचे झरना दास वैद्य यांनी विशेष उल्लेखाद्वारे निर्भया निधीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने २०१३ मध्ये स्थापन केलेला एक हजार कोटी रुपयांचा हा निधी अजिबातच खर्च करण्यात आला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
निर्भया निधी खर्च का केला नाही?
By admin | Published: February 09, 2017 2:01 AM