नवी दिल्ली - बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने थकीत रकमेची परतफेड करण्याचा पुर्नउच्चार केला आहे. सोळाव्या लोकसभेत संसदेतील अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मल्ल्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. याचाच संदर्भ देत मल्ल्यानं गुरुवारी (14 फेब्रुवारी) ट्विट केले आहे. मल्ल्यानं ट्विट करत म्हटलंय की, बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण मी ऐकले. निश्चित ते एक अतिशय उत्तम वक्ते आहेत. भाषणादरम्यान त्यांनी 9000 कोटी रुपये घेऊन पळालेल्या एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख केला. त्यांचा हा रोख माझ्यावर होता, याचा अंदाज मी लावू शकतो.
मी त्यांना आदरपूर्वक विचारू इच्छितो की, यापूर्वीही मी थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शवलेली असताना संबंधित रक्कम स्वीकारण्याचे बँकांना का निर्देश देत नाहीत?, असा प्रश्न मल्ल्यानं पंतप्रधान मोदींना विचारला आहे. शिवाय, किंगफिशरला दिलेल्या कर्जाची वसुली केल्याचे श्रेय ते घेऊ शकतात असेही मल्ल्याने टि्वटमध्ये म्हटलंय.
पुढे त्यानं असंही सांगितले की, कर्जफेडीसंदर्भात मी कर्नाटक उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दुर्लक्ष करुन हा अर्ज फेटाळला जाऊ शकत नाही. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले पैसे बँकांनी का घेतले नाहीत? असा प्रश्नही मल्ल्याने उपस्थित केला आहे. मी संपत्ती लपवून ठेवल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने केलेला हा दावा त्रासदायक आहे. जर संपत्ती लपवून ठेवली असती तर, जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबतची माहिती मी सार्वजनिकरित्या कोर्टासमोर कशी मांडली?, असंही मल्ल्यानं ट्विट केले आहे.