नवी दिल्ली - राफेल करारावरुन संसद सभागृहातही गदारोळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत राफेल डीलसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. तसेच मोदींच्या मुलाखतीवरही राहुल यांनी टीका केली. राफेल करारात 126 विमान घेण्याचं ठरलं होतं. मग, मोदी सरकारने ते डील 36 विमान खरेदीवर का आणून ठेवलं, असा प्रश्न राहुल यांनी विचारला. तसेच अनिल अंबानींना हे कंत्राट का दिलं, अख्खा देश याचं उत्तर मागतोय, असेही राहुल यांनी म्हटलं.
राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींनी 126 विमानांचा करार 36 विमानांवर का आणून ठेवला ? या करारातील विमानांची किंमत अचानकपणे का वाढली, यासह अनेक प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले. तसेच अनिल अंबानींच्या डोक्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही, राफेल कराराचे कंत्राट अयशस्वी उद्योजक ठरलेल्या अनिल अंबानींना का दिलं?. अंबानींनी करार होण्याच्या केवळ 10 दिवस अगोदर कंपनीची स्थापन केली होती, तरीही त्यांना हे कंत्राट देण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या शिफारसीवरुनच अनिल अंबानींना राफेलचं कत्राट देण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. राहुल यांच्या संसदेतील भाषणावेळी भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.