गिरीडीह/रांची : भाजप निवडणूक आयोगावर दबाव टाकत असून, भाजपने ‘षडयंत्र’ रचल्याने झारखंड विधानसभेच्या निवडणुका नियोजित वेळेपूर्वीच होत असल्याचा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार कल्पना सोरेन यांनी सोमवारी केला.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील मतदानाच्या वेळेतील तफावत आणि गेल्या निवडणुकीतील पाचवरून यावेळेपर्यंत दोन टप्प्यात होणारे मतदान यावर प्रश्न उपस्थित केले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची वेळ एक तासाने कमी करण्याच्या निर्णयावरही कल्पना यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, या बदलामुळे ग्रामीण मतदार, विशेषत: गरीब, मजूर, शेतकरी आणि सामान्यतः हेमंत सोरेन यांना पाठिंबा देणाऱ्या महिलांच्या मतदानात अडथळा निर्माण होईल.
स्वाभिमानावर घाला
- केंद्रातील सत्ताधारी पक्षाने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कल्पना यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
- सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता त्यांनी राज्याच्या स्वाभिमानावर घाला घातला आहे. झारखंडची जनता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे त्या म्हणाल्या.
आयोग म्हणतो...
- ग्रामीण भागात मतदानाची वेळ कमी करण्याबाबत झामुमोने केलेले आरोप निराधार आणि वस्तुस्थितीच्या पलीकडे असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने फेटाळून लावले.- आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी आयोगाच्या विशेष प्रयत्नांमुळे केवळ तीन टक्के (९८१) मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
घोषणा होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल
- झारखंड सरकारचे मंत्री मिथिलेश कुमार ठाकूर आणि झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) च्या इतर तीन उमेदवारांनी पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
- भाजपचे पंकी येथील आमदार कुशवाह शशीभूषण मेहता यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.