शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मशीद व मदरशांमध्ये का जात आहेत? मुस्लिमांमध्ये स्वीकारार्हता वाढवायची आहे की आंतरराष्ट्रीय दबावात प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे?
संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते; परंतु यात संघ कधीही यशस्वी झालेला नाही. श्रीराम जन्मभूमी आंदोलनापासून गुजरात दंगलींपर्यंत दरी मिटली नाही. मागील काही वर्षांत मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर संघ पहिल्यापेक्षा मजबूत होऊन पुढे आला आहे. कधी गोरक्षेच्या नावावर हत्या व कधी दहशतवादाच्या नावावर कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारवर संघाची प्रतिमा कट्टर हिंदुत्वाची झाली. अमेरिका व ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यावर कट्टर हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. साध्वी ऋतुंभरा यांचा चार दिवसीय दौरा ब्रिटन सरकारने हेट स्पीचमुळे रद्द केला. त्यांना अमेरिकेहून परतावे लागले. इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात रस्त्यांवर पोलिसांच्या समोर हिंदू-मुस्लिमांमध्ये झालेला संघर्ष ब्रिटनच्या माध्यमांनी उचलून धरला आहे. राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संयोजक व संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार म्हणतात की, मंचच्या विचारानुसार संघ सतत मुस्लिमांशी संपर्क वाढवत आहे. संघ नेहमी लोकांना व समुदायांना जोडण्याच्या बाजूने आहे.
उग्र हिंदुत्वाला सौम्य करायचे आहेमुस्लिमांशी जवळीक वाढत आहे व उग्र हिंदुत्वाची धार काहीशी सौम्य करायची आहे, हा संदेश आपल्या काऱ्यकर्त्यांना द्यायचा आहे. त्याचमुळे मागील एक वर्षाच्या कालावधीत संघप्रमुखांनी चार वेळा मुस्लिमांशी केवळ चर्चाच केलेली नाही तर गुरुवारी प्रथमच मशीद व मदरशाला भेट दिली.