लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसे राज्याराज्यांत वेगवेगळी राजकीय समीकरणे उदयास येऊ लागली आहेत. आंध्रमध्ये भाजपाची साथ तेथील स्थानिक पक्षाने सोडली आहे. तर इंडिया आघाडीतही अनेक छोटे पक्ष इशारे देत आहेत. जागावाटपावर अद्याप बोलणी सुरु व्हायची आहेत, अशातच दिल्लीत आप आणि काँग्रेसमधला तिढा सुटेल असे वाटत नसताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर संकेत दिले आहेत.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पवार यांनी हा दावा केला आहे. दिल्लीत काँग्रेसकडे सध्या एकही खासदार नाहीय. अशा परिस्थितीत केजरीवाल काँग्रेसला आघाडीम्हणून सातपैकी तीन जागा सोडण्यास तयार असल्याचे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे केजरीवालांनीच हे आपल्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ईडीच्या कारवाईमुळे इंडियाची आघाडी आणखी मजबूत होईल असेही पवार म्हणाले.
जर तुम्ही सत्तेत आलात आणि अदानींसोबत दिसलात तर राहुल गांधी टीका करतील, असे कसे चालेल या प्रश्नावर पवारांनी हसत हसत तुम्ही पहालच की कसे काम होईल ते, असे उत्तर दिले.
तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत. ते एका पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचे विचार वेगळे असू शकतात, असे पवार म्हणाले. मी अदानींसोबत फित कापण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या अधिपत्याखाली मुंद्रा पोर्ट देशातील सर्वात मोठा पोर्ट बनला आहे. आपला देश तिथून आज बरेच काही आयात-निर्यात करतोय. मग त्यांच्यावर टीका का करावी? तुम्ही राहुल गांधींनाच हा प्रश्न विचारा असेही पवार म्हणाले.