हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणाऱ्याने सांगितले कारण; पाटीदार आंदोलनाची किनार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:55 PM2019-04-19T15:55:23+5:302019-04-19T15:58:56+5:30
सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली.
सुरेंद्रनगर : काँग्रेसचे नेता आणि पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल आज सकाळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती. यावरून हार्दिकने भाजपवर आरोपही केला होता. मात्र, या व्यक्तीने कानशिलात मारण्याचे कारण सांगितले असून पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा राग यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचं आवाहन ते मतदारांना करत आहेत. त्यासाठीच, आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे. तसेच पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चोपल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
हा कानशिलात मारणारा व्यक्ती महेसाणा जिल्ह्यातील असून त्याचे नाव तरुण गज्जर आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये हार्दिक पटेलने पुकारलेल्या पाटीदार आंदोलनामुळे त्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तरुणची पत्नी गरोदर होती. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. या काळात सर्वत्र जाळपोळ सुरु असल्याने खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हाच मी हार्दिक पटेलला कानफडवणार असल्याचे पक्के केले होते. या माणसाला कोणत्याही प्रकारे वठणीवर आणणार, असे म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलच्या आंदोलनावेळी जन्मलेल्या मुलाला औषधे आणण्यासाठी गेलो होतो. यावेळी सर्वत्र बंद होता. तो रस्ते बंद करत होता. जेव्हा वाटेल तेव्हा गुजरात बंद करत होता. कोण आहे तो? तो काय गुजरातचा हिटलर आहे का? पाटीदार आंदोलनामध्ये ठार झालेल्या 14 तरुणांचा हत्यारा असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच हार्दिकला मारतेवेळी तरुण हा त्याच्या काँग्रेसमध्ये सहभागी होण्याविरोधातही ओरडत होता.
हार्दिक पटेलने या घटनेनंतर भाषण सुरुच ठेवले होते. यानंतर त्याने पत्रकारांना हे भाजपाचे कृत्य असल्याचे सांगितले होते. तसेच मारहाण करणारा व्यक्ती स्थानिक नसून बाहेरगावचा असल्याचा आरोप केला होता.