मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमताचा आकडा गाठला असला तरी, सरकार स्थापनेला उशीर होत आहे. भाजपा, शिवसेनेनं दबावाचं राजकारण सुरू केल्यानं सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेनेनं संधी साधत भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यात ही परिस्थिती असताना आर्थिक आघाडीवरील चिंताजनक परिस्थितीवरुनही शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकटाच अधिक झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पातळ्यांवरील हा शुकशुकाट एकच सवाल करतो आहे... 'इतना सन्नाटा क्यों है भाई?' असं सामनानं अग्रलेखात म्हटलं आहे.केंद्रातील मायबाप सरकार सांगतं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. शेतकरीही त्यासाठी खूप काबाडकष्ट घेतात, पण मध्येच नैसर्गिक आपत्ती येते आणि कित्येकदा शेतीवर केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न निघत नाही. त्यावर काय उपाय करायचा हे कोणीच सांगत नाही. आज देशभरात आर्थिक मंदी आहे. दिवाळीसाठी म्हणून बाजारपेठेत फटाक्यांबरोबरच खरेदीचा जो धुमधडाका असायला हवा, तो अजूनही दिसत नाही, अशा शब्दांत सामनानं आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकावर निशाणा साधला आहे.वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन पार पडले. पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दोन दिवस आणखी शिल्लक आहेत. मात्र मंदीच्या सावटामुळे 30 ते 40 टक्के खरेदी कमी झाल्याने बाजारपेठांतील रौनकच हरवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कारखानदारी धोक्यात आली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, रोज नवनवीन कंपन्या आणि प्रतिष्ठाने स्वत:ला दिवाळखोर जाहीर करत आहेत. बँकांचे दिवाळे वाजताना दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.जनतेचा खिसा तर रिकामा झाला आहेच, पण सरकारी तिजोरीतही खडखडाटच दिसतो. त्यामुळेच युद्धकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील पावणेदोन लाख कोटी रुपये काढून घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. घरातले सोने मोडण्यासाठी आजवर जनताच सराफांकडे जात असे. पण आता तर देशातील रिझर्व्ह बँकही आपल्याकडील सोन्याचा साठा मोडायला निघाली आहे, असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट ठेवलं आहे.
इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:46 PM