मुंबई : २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लान म्हणून का विकता, असा सवाल करीत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने टेलिकॉम कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने हे पाऊल उचलले आहे.
ट्रायने मुख्यत्वे मासिक प्लानबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. आजमितीस देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते. एक महिन्याचे अतिरिक्त शुल्क कंपन्या त्यांच्याकडून आकारतात, असा ग्राहकांचा आक्षेप असल्याचे ट्रायने म्हटले आहे. पोस्टपेड प्लानसाठी देयकसाखळी ही ३० दिवसांची, तर प्रीपेड ग्राहकांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. सर्व ग्राहकांसाठी ३० दिवसांची देयकसाखळी का नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना ट्रायने केली आहे. संबंधित सर्व दूरसंचार कंपन्यांनी ११ ते २५ जून २०२१ पर्यंत आपले म्हणणे मांडावे, असेही नमूद केले आहे.
ग्राहकांचे आक्षेप -- मासिक प्लान वैधता २८ दिवस का?- प्रीपेड आणि पोस्टपेडची देयकसाखळी समान का नाही?- ग्राहकांनी वर्षाला १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज का करावे?दोन महिन्यांपुढील रिचार्जवर आणखी लूट?दूरसंचार कंपन्यांनी मासिक रिचार्जची वैधता दोन दिवसांनी कमी केली असली तरी त्यापुढील सर्व रिचार्जचा कालावधी चार, सहा, आठ दिवसांपर्यंत कमी केलेला आढळतो. म्हणजे दोन महिन्यांच्या रिचार्जची वैधता ५६ दिवस, तीन महिन्यांसाठी ८४ दिवस आणि एका वर्षाच्या प्लानची वैधता ३५६ दिवस आहे. दिवसाला भरघोस डेटा वापरायला मिळत असल्यामुळे ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.