नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांवरील सामग्रीला कात्री का? असा सवाल करीत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) एनसीईआरटीला रविवारी चांगलेच फैलावर घेतले. याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सीआयसीने एनसीईआरटीला दिले.स्वामी विवेकानंद यांच्यावरील इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील सामग्री १२५० शब्दांवरून घटवून ३७ शब्द करण्यात आली. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून विवेकानंदांचा धडा पूर्णपणे गाळला गेला, असे का? असा सवाल सीआयसीने एनसीईआरटीला केला. शिवाय याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले. जयपूरचे सूर्यप्रताप सिंह राजावत यांनी माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलू यांच्यासमक्ष यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून ३६ राष्ट्रनेते आणि चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल्ल यासारख्या क्रांतिकारकांवरील सामग्री वा धडे गाळण्यात आल्याचा दावा राजावत यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
विवेकानंद, बोस यांची सामग्री कमी का केली?
By admin | Published: January 25, 2016 1:49 AM