मुंबई : 2019पर्यंत भारतीय विमानांत वायफायची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, असे एका अभ्यासात म्हटले आहे. अशा विमानास ‘कनेक्टेड एअरक्राफ्ट’ अशी संज्ञा असून, त्यात मेल चेक करणे, आपला प्रोफाईल अपडेट करणे अथवा अन्य स्वरूपाची इंटरनेटशी संबंधित कामे केली जाऊ शकतील. पॅसेंज आयटी ट्रेंड क्षेत्रात काम करणाऱ्या ‘एसआयटीए’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, हवाई उद्योग क्षेत्राने संपूर्ण कनेक्टेड प्रवासाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यात विमानात चढल्यापासून गंतव्य स्थानी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण प्रवास कनेक्टेड असेल. अशा प्रकारची कनेक्टेड विमाने सध्या जागतिक पातळीवरील काही कंपन्यांच्या ताफ्यात सामील होऊ लागली आहेत. आगामी १0 ते २0 वर्षांत त्यात पूर्ण गतीने वाढ होईल. जुन्या विमानांची जागा नवीन विमाने जसजशी घेतील तसतशी कनेक्टेड विमानांची संख्या वाढेल. सर्वेक्षणात म्हटले आहे की, भारतात अद्याप एकही कनेक्टेड विमान नाही. तथापि, अशा विमानांची गरज असल्याची जाणीव या उद्योगाला होऊ लागली आहे. सुमारे अर्ध्या कंपन्या तरी कनेक्टेड विमाने आणतील. जागतिक पातळीवरील ६६ टक्क्यांच्या तुलनेत मात्र हे प्रमाण कमीच आहे. विमानांत वायफाय कनेक्टिव्हिटी पुरविण्यास भारतात अद्याप परवानगीच दिलेली नाही. नव्या विमानांत अशा कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध करून देता येऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, वायफाय सुविधेला परवानगी देण्याआधी सुरक्षाविषयक मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. विमान प्रवासात अनेक बंधने असतात; तसेच विविध पातळ्यांवर तपासण्याही होतात. या सगळ्यांमागे सुरक्षाविषयक कारणे असतात.
भारतीय विमानांत 2019पर्यंत वायफाय सुविधा अपेक्षित
By admin | Published: December 24, 2016 1:24 AM