नवी दिल्ली: इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील व्हिडीओ, फिल्म, सेक्स वेबसाइट पाहणारे असंख्य प्रेक्षक आहेत. मात्र, आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झालेल्या पॉर्नोग्राफीचा श्रोतृवर्ग भारत व जगामध्ये वाढत आहे. स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्म्सवर कोणाही व्यक्तीला आपले प्रोफाइल तयार करून पॉडकास्ट स्ट्रीम करण्याची सोय असल्याने ऑडिओ पॉर्नोग्राफीचा प्रसार भारतातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याची मागणी होत आहे. (वृत्तसंस्था)
ऑडिओ पॉर्नच्या शोधात असंख्य
देशात पॉडकास्ट स्ट्रीम करणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेतली तर स्पॉटिफाय हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपल्या पसंतीच्या गाणे, कलाकार यांच्याबद्दल माहिती घेण्याबरोबरच सेक्स स्टोरीज असा की-वर्ड टाकून ऑडिओ पॉर्नचा शोध घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये इरोटिक ऑडिओ स्टोरीजपासून सेक्शुअल ॲक्टच्या नॅरेशनपर्यंत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.
भारतात अनेक पॉर्न वेबसाइटवर निर्बंध घातले आहेत. ९२४ पॉर्न वेबसाइटविरोधात लोकांनी माहिती-तंत्रज्ञान खात्यांकडे तक्रार किंवा न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर ६७ पॉर्न वेबसाइटवर सप्टेंबर २०२२ मध्ये बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ज्या पॉर्न वेबसाइटविरोधात तक्रार दाखल होते, त्यांच्या विरोधातच कारवाई होते असा आजवरचा इतिहास आहे.
तक्रार केल्यास होते कारवाई
गाना, सावन, विंक, स्पॉटिफायसारखे ॲप्स मुख्यत्वे म्युझिक स्ट्रिमिंग ॲप म्हणून ओळखले जातात; पण तिथे पॉडकास्टच्या नावाखाली अश्लील गोष्टींचे ऑडिओ प्रक्षेपण चालते. अशा गोष्टींमुळे जर माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग होत असेल तर त्याबाबत तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
माहिती-तंत्रज्ञान कायदा
आता अश्लील ऑडिओ मेसेजचादेखील पॉर्नमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑडिओ सेक्स स्टोरीज ऐकविणारे ॲप अमेरिकेत २०१९ सालापासून उपलब्ध आहेत. भारतातही हे ॲप गुगल प्ले स्टोअर, ॲपल स्टोअरवर सहज मिळू शकतात.