गुरुग्राम - येथील सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रितू शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेला मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून न्यायाधीश शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच न्यायाधीशांची पत्नी आणि मुलावर हा गोळीबार केला या घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल महिपाल याला अटक करण्यात आली. त्याला गुरुग्राम-फरीदाबाद मार्गावरुन बेड्या ठोकण्यात आल्या. महिपालनं हा प्रकार का केला, याबद्दल त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुरुग्राम पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष बोकान यांनी पीटीआयला दिली. कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी रितू (38) मुलगा ध्रुवसह (18) शॉपिंग करण्यासाठी दुपारी 3 च्या सुमारास सेक्टर 51 मधील आर्केडिया मार्केटला गेल्या होत्या. त्यावेळी कृष्णकांत यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला हेड कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत होता, अशी माहिती डीसीपी सुलोचना गजराज यांनी दिली. 'आर्केडिया मार्केटमध्ये गोळीबार झाल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यावेळी रितू आणि ध्रुव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते,' असं गजराज यांनी सांगितलं.