मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात असलेल्या गंगा-मालनपूर गावात एक धक्कादायक घटना घडली. हरिचरण आणि त्यांच्या पत्नीच्या प्रेमकथेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांत दु:खात असलेल्या पत्नीचाही मृत्यू झाला. वर्षभरापासून कॅन्सरने त्रस्त असलेल्या हरिचरण यांचं सोमवारी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीचंही निधन झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगा-मालनपूरचे रहिवासी हरिचरण यादव (५५ वर्षे) हे लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन म्हणजेच LIC मध्ये एजंट म्हणून काम करायचे आणि गावात शेतीचे कामही सांभाळायचे. त्यामुळेच आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये त्यांची खूप ओळख होती.
हरिचरण यांचं ३० वर्षांपूर्वी किशोरी यादव यांच्याशी विवाह झाला होता. हरिचरण यादव यांना वर्षभरापूर्वी कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. प्रत्येक वेळी ते पत्नी किशोरीला सांगत असे की, मला जगायचं आहे, पण कदाचित देवाला मी तुला सोडून जावं असं वाटत असेल.
गावकऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये कधीही भांडण झालेलं कोणी पाहिलं नाही. त्यांना तीन मुलं होती. दोघांची लग्नं झाली. नातवंडंही होती. मोठं कुटुंब होतं. त्यांचं वयही फारसे नव्हतं. पण पतीचा मृत्यू झाल्यानंतरच काही मिनिटांत पत्नीचंही निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.