गाझियाबाद - अनेक वाद-विवाद, चर्चेनंतर अखेर पद्मावत चित्रपट रिलीज होत आहे. वादाच्या भोव-यात अडकलेल्या 'पद्मावत' चित्रपटात नेमकं असं काय आहे ज्यामुळे एवढा मोठा वाद झाला हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनेक ठिकाणी थिएटर हाऊसफुल्ल झाली असून, ऑनलाइन बुकिंगला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका पत्नीने आपल्या पतीकडे 'पद्मावत' चित्रपट पाहण्याचा हट्ट केलाय. पण करणी सेनेने थिएटर फोडण्याची धमकी दिली असल्याने पत्नीच्या या मागणीमुळे पतीला घाम फुटला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना ट्विट करत पतीने सुरक्षेची हमी मागितली आणि विशेष म्हणजे पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिलं आहे.
ही गाझियाबादमधील घटना आहे. गाझियाबादमधील संदीप सिंह यांनी सोमवारी गाझियाबाद पोलिसांना एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, 'माझी पत्नी पद्मावत चित्रपट पाहण्याचा हट्ट करत आहे. चित्रपट पाहायला गेल्यास माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी गाझियाबाद पोलीस देऊ शकते का ?'.
गाझियाबाद पोलिसांनी संदीप सिंह यांच्या ट्विटला उत्तरही दिलं. 'तुम्ही निश्चिंत होऊन सिनेमा पाहायला जा. गाझियाबाद पोलीस तुम्हाला सुरक्षा पुरवेल,' अशी हमी पोलिसांनी दिली.
उद्या म्हणजेच 25 जानेवारीला पद्मावत चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. करणी सेना अद्यापही चित्रपटाचा विरोध करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहांची तोडफोड करण्यात येईल अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.