भागलपूर – आयुष्यभर तुझी साथ देईन अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...बिहारच्या भागलपूरमधील कहलगावात सध्या अशाच प्रेमकहानीचं दृश्य पाहायला मिळलं आहे. कहलगावात एका वृद्धाचं निधन झालं. या वृद्ध शेतकऱ्याचं वय १०० वर्षे इतकं होतं. या वयात मृत्यू होणं स्वाभाविक आहे. परंतु पतीच्या निधनाचं वृत्त पत्नीला सहन झालं नाही. दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते. कधीही वादविवाद झाला नाही.
हे दोघंही संपत्तीने गरीब असले तरी मनाने, प्रेमाने श्रीमंत होते. वृद्ध पतीच्या मृत्यूची बातमी कळताच ९० वर्षीय पत्नीनेही तिचा प्राण सोडला. माहितीनुसार ही घटना कहलगावच्या परिसरातील आहे. लग्नाच्या सात पवित्र फेऱ्यात अग्निला साक्षी मानून दोघांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली होती. सात जन्म साथ देईन असं वचन एकमेकांना दिलं होतं. तेच वचन मृत्यूच्या अखेरच्या श्वासापर्यंत दोघांनी निभावलं. ही कहानी आहे जागेश्वर मंडल आणि रुक्मिणी देवी यांची...
जागेश्वर मंडल यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सकाळी पतीच्या निधनाची वार्ता समजताच रुक्मिणी देवी यांनी त्यांचे प्राण त्याग केले. पती जागेश्वर मंडल यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणी त्यांच्या मृतदेहाजवळ गेली. तिने पतीला घट्ट मिठी मारली. हातात हात घेतला आणि तिनेही जगाचा अखेरचा निरोप घेतला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीला दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीने निभावलं. हे दोघंही वृद्ध होते. जागेश्वर मंडल यांनी मृत्यूपूर्वी खाणं-पिणं सोडून दिलं होतं. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती राहत असतानाही दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम होते.