उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या 12 तासांतच पतीचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने पती काशीराम अत्यंत दु:खी झाले. त्यांना मोठा धक्का बसला. जवळचे नातेवाईक त्यांची सतत काळजी घेत होते. नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण काशीराम यांची मनस्थिती अत्यंत वाईट होती. याच दरम्यान विरह सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला
फतेहाबादच्या जोनेश्वर घाटावर दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मृत्यूपूर्वी या जोडप्याने एकत्रच हे जग सोडण्याची चर्चा होती. अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. फतेहाबाद शहरातील आंबेडकर परिसरात ही घटना घडली आहे.
कमलेश उर्फ मलुकी यांचं लग्न नगला येथील रहिवासी काशीराम यांच्याशी 40 वर्षांपूर्वी झालं होतं. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. कमलेश नेहमीप्रमाणे घरातील काम करत होत्या. मात्र 10 वाजण्याच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला.
कमलेश यांचा भाऊ विजेंद्र डेहराडूनमध्ये सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी तो येणार होता. मात्र त्याला वेळ लागणार होता. अंत्यसंस्कारासाठी सर्वजण विजेंद्रच्या येण्याचा वाट पाहत होते. मात्र रात्री कमलेश यांचा नवरा काशीराम यांनाही अटॅक आला. त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.