भुवनेश्वर – ओडिशा येथील कालाहंडी जिल्ह्यातील पत्नीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या एका वृद्धानं अंत्यसंस्कारावेळी पत्नीच्या जळत्या चितेवर उडी मारली आहे. बुधवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या व्यक्तीचा भाजल्याने मृत्यू झाला आहे. मंगळवारी कालाहंडी जिल्ह्यातील गोलामुंडा ब्लॉकमधील सिआलजोडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ६५ वर्षीय निलामणी सबर यांच्या पत्नी रायबडी सबर यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी समुदायातील निलमणी हे पत्नी रायबडीच्या जाण्यानं खुप दु:खी होते. अंत्यसंस्कारावेळी निलामणी सबर यांची ४ मुलं आणि नातेवाईक प्रथा परंपरेनुसार जलाशयात आंघोळ करण्यासाठी गेले असता निलामणी सबर यांनी पत्नी रायबडीच्या जळत्या चितेत उडी मारली. चितेत उडी मारल्यानंतर निलामणी यांचा आक्रोश ऐकून मुलं आणि इतर लोकं धावत चितेजवळ पोहचले परंतु खूप उशीर झाला होता. जोपर्यंत जळत्या चितेतून निलामणी यांना बाहेर काढेपर्यंत त्यांचे निधन झालं होतं.
पोलिसांनी नोंदवला अनैसर्गिक मृत्यू
रिपोर्टनुसार, निलामणी सबर हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. केगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दामू पराजा म्हणाले की, आम्ही घटनास्थळी असणाऱ्या नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा जबाब नोंदवून घेतला आहे. हा अनैसर्गिक मृत्यू आहे. प्रथमदर्शनी पत्नीच्या विरहामुळे पतीने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसून येते. परंतु पोलीस तपास सुरु आहे असं त्यांनी सांगितले.