संसार चालवत असताना पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे कौटुंबिक वादविवाद ही मागच्या काही काळापासून एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका जोडप्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मेरापूर मोहल्ल्यामधील रहिवासी असलेल्या रामू वर्मा आणि त्याची पत्नी रूबी यांच्यात रविवारी संध्याकाळी काही कारणावरून भांडण झालं. त्यानंतर रामू रागाने आपल्या खोलीत जाऊन झोपला. तर रूबी दुसऱ्या खोलीत गेली. तसेच तिने रागाच्या भरात गळफास लावून घेतला.
दरम्यान, जेव्हा रामू उठला तेव्हा त्याने पत्नीने गळफास लावून जीवन संपवल्याचे पाहिले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या रामूनेही गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही घटना घडली तेव्हा या दाम्पत्याची दोन्ही मुले झोपली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आण शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांकडे पाठवण्यात आले.