बिहारमधील जमुई येथे व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. २१ वर्षीय इंद्रा कुमारीने तिच्या दारुड्या पतीला कंटाळून एका मंदिरात लोन रिकव्हरी एजेंट पवन कुमार यादवशी लग्न केलं. आता हा प्रेमविवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
इंद्रा कुमारीचं लग्न २०२२ मध्ये चकाई येथील रहिवासी नकुल शर्मा याच्याशी झालं होतं. पण नकुलच्या दारूच्या व्यसनामुळे आणि घरगुती हिंसाचारामुळे इंद्राचं जीवन कठीण झालं. या काळात तिची भेट पवन कुमार यादवशी झाली, जो एका फायनान्स कंपनीत लोन रिकव्हरी एजंट आहे. दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली आणि गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते.
४ फेब्रुवारी रोजी दोघेही घरातून पळून गेले आणि आसनसोलला पोहोचले, जिथे इंद्राची मावशी राहते. यानंतर ११ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन वीकमध्ये दोघांनीही जमुई येथील त्रिपुरारी घाट येथील शिव मंदिरात लग्न केलं.
लग्नानंतर पवनच्या कुटुंबाने हे नातं स्वीकारलं, परंतु इंद्राचं कुटुंब या निर्णयावर नाराज आहे. इंद्राच्या कुटुंबाने पवनविरुद्ध चकाई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
इंद्रा म्हणते की, तिने हे लग्न स्वतःच्या मर्जीने केलं आहे आणि पवनवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याच वेळी पवनने इंद्रावर त्याचं प्रेम असून दोघेही आता एकमेकांसोबत राहू इच्छितात असं म्हटलं आहे. इंद्रा आणि पवन यांनी प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे.