कोलकाता : भारत आणि पाकिस्तानने तणाव न वाढवता चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान बबलू संतरा यांच्या विधवा पत्नी मीता संतरा यांनी गुरुवारी केले.
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले. त्यात बबलू संतरा यांचाही समावेश होता. ‘मी युद्धाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्यावर समाज माध्यमातून होणाऱ्या टीकेबद्दल मला काळजी वाटत नाही’, असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानने बुधवारी ताब्यात घेतलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने सर्व ते प्रयत्न करावेत, असे आवाहनही मीता संतरा यांनी केले. ‘आम्ही आणखी अनेक बळी घेणाऱ्या युद्धाऐवजी संवादाला संधी दिली पाहिजे, असे त्या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या. वर्धमान यांना परत आणण्यासाठी सरकारने पाकिस्तानशी बोलणी करावी, असे त्या म्हणाल्या.युद्धात दोन्ही बाजुंकडील जीवित हानीसह त्याचे आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवरही परिणाम होतात, असे संतरा म्हणाल्या. सशस्त्रदलांना युद्धावर जावे लागून सर्वोच्च बलिदानही करावे लागते. हे स्वाभाविक असले तरी भारत सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, असे मीता म्हणाल्या. सुरक्षा दले सुरक्षित राहिली पाहिजेत, असे मला वाटते.सीआरपीएफलाही सुरक्षा हवीलष्कर किंवा सीआरपीएफ किंवा आयटीबीपी ही निमलष्करी दले असोत ती भारत सरकारची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.