पुलवामा येथे दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (Central Reserve Police Force) ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या हल्ल्यानंतर काही दिवसानंतर पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल (Major Vibhuti Shankar Dhoundiyal) हे शहीद झाले. आज शहीद विभूती यांच्या पत्नीने लेफ्टनंटपदी रूजू होऊन पतीला श्रद्धांजली वाहिली आहे.
शहीद मेजर विभूती यांना पुलावाच्या भूमीवर वीरमरण प्राप्त झालं. देशासाठी या भारतमातेच्या या सुपुत्रानं बलिदान दिलं. मात्र, दुर्दैवी म्हणजे वीरगती प्राप्त झाल्याच्या ९ महिन्यांपूर्वीच विभूती यांचे लग्न झाले होते. ९ महिन्यांच्या सुखी संसारानंतर २७ वर्षीय नितिका कौल धौंडीयाल (Nikita Kaul Dhoundiyal ) यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. पण, मेजर धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही. निकीता यांनी पतीच्या निधनाच्या दुःखावर रडत न बसता भारतीय सैन्यात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज हा निर्णय पूर्णत्वास आला आहे.
पतीच्या निधनानंतर आपणही सैन्यात भरती होणार असल्याचं निकिता यांना म्हटलं होतं. त्यानंतर, सहा महिन्यानी निकिता यांनी Short Service Commission (SSC) चा फॉर्म भरला आणि त्या परिक्षेत उत्तीर्णही झाल्या. Services Selection Board (SSB) ने त्यांची मुलाखतही घेतली. त्यानंतर चेन्नईत त्यांनी Officers Training Academy (OTA) प्रशिक्षण घेतलं आणि आज २९ मे २०२१ रोजी त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू झाल्या आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी ही मर्दानी सज्ज झाली आहे. युद्धात वीरगती पत्करलेल्या आपल्या पतीला निकीता यांनी वाहिलेली हीच खरी श्रद्धांजली आहे.
माझा खरा प्रवास आत्ता सुरू झाला आहे, गेल्या 11 महिन्यांनी मला खूप काही शिकवलंय. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे मी आभार मानते. माझी आई आणि माझ्या सासू या प्रवासात सदैव सोबत होत्या, त्यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. आपल्या स्वत:वर विश्वास ठेवा, तुम्ही जे ठरवता, ते मिळवायला तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा, असे निकिता यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
दरम्यान, मागील वर्षी त्यांनी हरयाणा पोलिसांना १००० प्रोटोक्टीव्ह किट्सही दान केले होते. त्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी त्यांचे आभारही मानले होते.