चेन्नई, दि. 21 - आपल्या विवाहित मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणा-या बापाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या दुस-या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली आहे. शनिवारी रात्री आरोपी मनालीमधील आपल्या घरी असताना, मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी संतापलेल्या पत्नीने मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला, ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला.
मृत आरोपीचं नाव दुरईराज असं आहे. चोरी, दरोड्यासारख्या गुन्ह्यांखाली त्याला अटकही करण्यात आली होती. त्याची पत्नी मंजुळाने जामीनावर सुटका केली होती. दुरईराज आणि मंजुळा आपल्या 21 वर्षीय मुलगी रजनीसोबत मनालीमध्ये राहत होते.
घरखर्च लावण्यासाठी मंजुळा घराजवळ चहाचं दुकान चालवयची. दुरईराज मात्र बेरोजगार होता. इतकंच नाही तर आपल्या पत्नीच्या दुकानातून पैसेही चोरी करायचा. यावरुन दोघांचं खूप मोठं भांडणही व्हायचं. दोन वर्षापुर्वी मंजुळा यांनी मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या घरच्यांना बोलावलं होतं. यावरुन चिडलेल्या दुरईराजने मंजुळावर हल्ला करत, मान आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यावेळी मंजुळा यांनी कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र यानंतर दुरईराजने मंजुळाला पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती.
तीन महिन्यांपुर्वी त्याच्या अत्याचाराला कंटाळून मंजुळा यांनी पोलिसात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दुरईराजला अटक केली होती. तपास अधिका-याने सांगितलं आहे की, 'यादरम्यान मंजुळाने स्टीफन नावाच्या मुलाशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं. स्टीफन त्याच परिसरात एसी मेकॅनिक म्हणून काम करत असे'. मुलीचं लग्न झालं असल्याने मंजुळा यांनी पतीचा जामीन करण्याचा निर्णय घेतला. 17 ऑगस्ट रोजी त्यांनी जामीन करत दुरईराजला बाहेर आणलं.
घरी पोहोचला असता दुरईराजला मुलीचं लग्न झाल्याचं कळलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने मुलीवर अत्याचार केले आणि लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावत आले आणि मुलीला वाचवलं. हे सर्व झालं तेव्हा मंजुळा घरात नव्हती. घरी आल्यावर तिला सर्व माहिती मिळाली, यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. संतापलेल्या मंजुळा यांनी दुरईराज झोपला असताना एक मोठा दगड आणून त्याच्या डोक्यात घातला. दुरईराजचा जागीच मृत्यू झाला. मंजुळा यांनी पोलिसांसमोर आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.