'पत्नीला स्वयंपाक येत नाही म्हणजे...'; न्यायालयानं पतीची घटस्फोट याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:25 AM2023-10-19T10:25:42+5:302023-10-19T10:26:10+5:30
पतीनं पत्नीवर केले होते असे आरोप...
केरळ उच्च न्यायालयात पती-पत्नीसंदर्भात एक असे प्रकरण पोहोचले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. खरे तर, पत्नीला जेवण बनवता येत नाही, म्हणून एका व्यक्तीला तिच्यापासून घटस्फोट घ्यायचा होता. यासाठी या व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर बुधवारी सुनावणी झाली. उच्च न्ययालयाने संबंधित पतीची घटस्फोट याचिका फेटाळळी आहे. तसेच, पत्नीला भोजन बनवता न येणे क्रूरता नाही. या आधारावर घटस्फोटाची मागणी केली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संबंधित याचिका जस्टिस अनिल के. नरेंद्रन आणि जस्टिस सोफी थॉमस यांच्या बेंच समोर होती. यात पतीकडून म्हणण्यात आले होते की, पत्नीला जेवण बनवता येत नाही. यासाठी ती तयारही नाही. या दोघांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. हे पती-पत्नी बऱ्याच दिवसांपासून अबू धाबी येथे राहत होते. एवढेच नाही तर, पत्नीने नातेवाइकांसमोर आपला अपमान केला, असा युक्तिवादही पतीने केला.
पतीनं पत्नीवर केले होते असे आरोप -
पतीने म्हटले होते की, पत्नी कधीही आपला आदर करत नव्हती आणि आपल्यापासून अंतर ठेवून राहत होती. तसेच आपल्या आईसोबतही भांडण करत होती. मात्र, संबंधित पत्नीने पतीच्या सर्व आरोपांना विरोध करत म्हटले आहे की, पतीमध्ये लैंगिक विकृती होती. त्याला मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्यांनी औषधी घेणेही बंद केले आहे.