बेंगळुरू - बेंगळुरूमधील दोन महिलांनी एकमेकींच्या पतीला किडनीदान करत त्यांचे प्राण वाचवले. त्या रुग्णालयांत किडनी घेऊन जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर बनवला होता. दोन रुग्णालयांतील रुग्णांमध्ये अशा प्रकारे अवयव प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.रेखाचे पती आजारी असल्याने त्यांना हेब्बल येथील कोलंबिया आशिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनीची गरज होती. याचदरम्यान राजाजीनगर येथील सगुणा रुग्णालयात अपर्णाचे पती उपचार घेत होते. त्यांनाही किडनीची गरज होती. दोघीही आपापल्या पतींना स्वत:ची किडनी देण्यास तयार होत्या. मात्र रक्तगट जुळत नव्हते. दरम्यान, रेखाने किडनीच्या शोधात असलेल्या अपर्णाच्या पतीला तर अपर्णानेही त्या बदल्यात रेखाच्या पतीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांचे रक्तगट जुळले. परंतु, दोन रुग्णालयांमधील रुग्णांची अशा प्रकारे पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण होणार असल्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास बराच वेळ गेला.अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी दोन्ही रुग्णालयांदरम्यान बुधवारी सकाळी ८.१५ आणि ८.४५ वाजता ग्रीन कॉरिडोर बनवला. सकाळी ८.२७ वाजता अपर्णाची किडनी कोलंबिया रुग्णालयात तर, रेखाची किडनी कोलंबिया रुग्णालयातून सकाळी ८.५६ वाजता सगुणा रुग्णालयात पोहोचविण्यात आली. सकाळी १० वाजता दोन्ही किडनींचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. (वृत्तसंस्था)
पत्नींनी वाचवले पतींचे प्राण, एकमेकांच्या किडनीचे दान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:05 AM