पती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:36 AM2019-08-31T10:36:38+5:302019-08-31T10:37:25+5:30
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स परिसरातील हे घटस्फोटाचे प्रकरण आहे.
भोपाळ: कोण, कधी, कोणत्या कारणासाठी घटस्फोट घेईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. एका महिलेने आपल्या पतीसोबत घटस्फोट मागितला आहे, या घटस्फोटाचे कारण ऐकून तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. या महिलेने आपला पती यूपीएससीची तयारी करण्यात गुंग असल्यामुळे घटस्फोट मागितला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स परिसरातील हे घटस्फोटाचे प्रकरण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचे म्हणणे आहे की, तिचा पती सतत यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त असतो, त्यामुळे तिच्याकडे लक्षच देत नाही. पती खोली बंद करुन यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. यावेळी ते इतके गुंतले असतात की अनेकदा संपूर्ण दिवसभर बोलत सुद्धा नाहीत, अशी माहिती या महिलेने भोपाळ येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय दिली आहे.
याचबरोबर, बऱ्याचदा शॉपिंग करण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी आणि बाहेर फिरायला घेऊन जाण्यास पतीला सांगितले असता त्याकडे त्यांचे लक्षच नसते, असे या महिलेने म्हटले आहे. विशेष म्हणजे, माहेरी गेल्यानंतर सुद्धा पती आपल्याला फोन करत नाही, असेही या महिलेने न्यायालयात सांगितले आहे.
पतीसोबत असणे किंवा नसणे सारखेच!
लग्नाला दोन वर्षे झाली असून पती फक्त यूपीएससी परीक्षेच्या तयारीकडे लक्ष देत आहे. माझ्यासाठी पती सोबत असणे किंवा नसणे सारखेच झाले आहे. मी मुळची मुंबईची असून भोपाळमध्ये माझे कोणीच नातेवाईक नाहीत. त्यांच्यामुळे मला आधार मिळेल असे. त्यामुळे एकटे राहावे लागत असल्यामुळे आयुष्याचा कंटाळा आला आहे, असे या महिलेने म्हटले आहे.
पतीकडून कोणतीही तक्रार नाही
पतीची बाजू ऐकण्यासाठी काऊंसलर नुरान्निशा खान यांनी न्यायालयात त्यांना बोलविले असता. पतीने सांगितले की, 'लहानपणापासून माझे यूपीएससीचे लक्ष आहे. त्यामुळे माझा जास्तवेळ यूपीएससीच्या तयारीसाठी जातो.' तर, काऊंसलरच्या माहितीनुसार, या महिलेविषयी पतीकडून कोणतीही तक्रार नाही. पण, पतीला असे वाटते की, त्यांचे वैवाहिक आयुष्य सध्या स्थिर नाही. त्यामुळे पुढे जाऊन अधिक बिघडू नये.